सेलूतील खून प्रकरणानंतर तणाव वाढला; दोन तास मृतदेह पोलीस ठाण्याबाहेर ठेवून नागरिकांचा संताप.!

सेलू (प्रतिनिधी) – गायत्री नगरातील युवक आदित्य प्रधान यांच्या खून प्रकरणानंतर शहरातील वातावरण चांगलेच तापले असून संतप्त नागरिकांनी थेट पोलीस प्रशासनालाच जाब विचारल्याचे चित्र पाहायला मिळाले.
घटनेनंतर आदित्य प्रधान यांच्या कुटुंबीयांनी व परिसरातील नागरिकांनी मृतदेह थेट ॲम्बुलन्समधून सेलू पोलीस ठाण्याच्या आवारात आणून ठेवला. मुख्य आरोपी अशोक पाईकराव यास तात्काळ अटक करावी तसेच इतर आरोपींनाही लवकरात लवकर पकडावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. पोलीस ठाण्याच्या गेटसमोर बराच वेळ मृतदेह ठेवण्यात आल्याने परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.


यावेळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते. संतप्त जमावाने पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. “मयताला न्याय मिळालाच पाहिजे” अशी ठाम भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फरार आरोपींच्या शोधासाठी सहा विशेष पथके तयार करण्यात आली असून लवकरच सर्व आरोपींना ताब्यात घेतले जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी पार पडला.
या घटनेमुळे सेलू शहरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस प्रशासनाचा वचक कमी झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. त्यामुळे या प्रकरणात त्वरीत आणि कठोर कारवाई करून कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button