
६०० हून अधिक मुक्या जीवांना जीवनदायी उपचार
सेलू | प्रतिनिधी सतिश आकात
वाढदिवस म्हटला की केक कापणे, फळवाटप, अन्नदान किंवा इतर सामाजिक उपक्रम असे चित्र नेहमी दिसते. मात्र सेलू येथील पशुसमाजसेवक डॉ. विकास गुलाबराव राठोड यांनी आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधत मुक्या जनावरांच्या सेवेला प्राधान्य देत मोफत सर्वरोग निदान व पशुवैद्यकीय शिबिर आयोजित करून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.

या शिबिरात जनावरांचे लसीकरण, जंतनिर्मूलन, गोचीड व गोमाशी निर्मूलन, वंध्यत्व निवारण, गर्भ तपासणी, कृत्रिम रेतन, खच्चीकरण, भटक्या जनावरांचे मोफत लसीकरण व प्रथमोपचार, तसेच श्वान व मांजरींसाठी रेबीज प्रतिबंधक लसीकरण अशा विविध सेवा पूर्णपणे मोफत देण्यात आल्या.
शिबिरादरम्यान गोशाळेतील ४५० जनावरांवर उपचार, १२ गर्भ तपासण्या, १६ खाजगी बैल व गायींची तपासणी, ७७ शेळ्यांचे लसीकरण व उपचार, ५३ श्वान आणि १७ मांजरींना रेबीज लसीकरण व उपचार करण्यात आले. पहाटे ६ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत अखंड सेवा देत डॉ. राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुक्या जीवांसाठी आपला संपूर्ण दिवस अर्पण केला.
गेल्या दोन वर्षांपासून डॉ. विकास राठोड वाढदिवसानिमित्त अशाच प्रकारचे मोफत पशुवैद्यकीय सेवा उपक्रम राबवत असून, त्यांच्या या कार्याचे सेलू शहरासह परिसरातून मोठे कौतुक होत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबतच मुक्या जनावरांचा आशीर्वाद मिळविण्याचा त्यांचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दीपक धर्माधिकारी (पशुधन सहाय्यक अधिकारी), सौ. उत्तरा ऐंगडे, डॉ. अनिकेत पंडागळे, डॉ. खंडागळे, डॉ. पप्पू शेळके, डॉ. मारोती खंदारे तसेच मित्रमंडळ आणि डॉक्टर संघाचे मोलाचे सहकार्य लाभले.
डॉ. विकास राठोड यांच्या या आगळ्यावेगळ्या सामाजिक उपक्रमामुळे वाढदिवस केवळ उत्सव न राहता मुक्या जीवांच्या सेवेतून समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि कर्तव्यभावना जपणारा प्रेरणादायी संदेश ठरला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सेवाभावाची नवी प्रेरणा निर्माण होत आहे.