
बैलजोडीसह शेतीमाल जळून खाक
सेलू:तालुक्यातील धनेगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान गूरूवार १ रोजी झाले आहे. या आगीत शेतक-याच्या शेत आखाड्यावरील बैलजोडीसह कापूस आणि सोयाबीन जळून खाक झाले असून, शेतकरी कुटुंब संकटात सापडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धनेगाव शिवारातील गट नंबर १४१ मधील शेतकरी रामभाऊ देविदासराव कटारे यांच्या आखाड्यावर गूरूवार रात्री अंदाजे १० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, आखाड्यावर बांधलेली एक बैलजोडी आगीमूळे मृत्यूमूखी पडली.या आगीत पशुधनासह कापूस,सोयाबीनचे नुकसान झाले आहे. यामध्ये अंदाजे २० क्विंटल कापूस आणि १२ क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले आहे. वर्षभराची मेहनत आणि उत्पन्नाचे साधन डोळ्यादेखत जळताना पाहून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती. नुकसानग्रस्त शेतकरी रामभाऊ कटारे यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
