
सेलू (प्रतिनिधी):
सेलू शहर व परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी अखेर कडक कारवाईचा बडगा उगारत वाळू माफियांना चांगलाच धडा शिकवला आहे. हसमुख कॉलनी परिसरात अवघ्या तीन तासांच्या अंतराने झालेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी दोन ट्रॅक्टर व अवैध रेती असा तब्बल ९ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पहिली कारवाई : सकाळीच रेती माफियांना रंगेहात पकडले
दि. २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७:३५ वाजता, हसमुख कॉलनी येथील परफेक्ट सर्व्हिसेस सेंटरसमोर सेलू पोलिसांनी सापळा रचून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली.
यामध्ये आरशद मुमताज पठाण (२५) व आशरफ पठाण (दोघे रा. हदगाव खु.) हे विनापरवाना लाल रंगाच्या महिंद्रा ‘सरपंच’ ट्रॅक्टरमधून रेती वाहतूक करताना आढळून आले.
पोलिसांनी ट्रॅक्टर व रेती असा ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार पुलाते करत आहेत.
दुसरी कारवाई : तीन तासांतच पुन्हा कारवाई, दुसरा ट्रॅक्टर जाळ्यात
पहिली कारवाई ताजी असतानाच सकाळी १०:०५ वाजता, पोलिसांनी त्याच परिसरात पुन्हा धडक कारवाई करत जनार्धन बबनराव भाबट (रा. खादगाव) याला निळ्या रंगाच्या सोनालिका ट्रॅक्टरसह पकडले.
ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास अवैध रेती आढळून आली. या कारवाईत ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तपास पोलीस हवालदार मुलगीर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
कडक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल
शासनाचा महसूल बुडवून बेकायदेशीर वाळू विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८ (७)(८) नुसार गुन्हे दाखल केले आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, सहायक पोलीस उपनिरीक्षक भिसे यांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे सेलू परिसरातील अवैध वाळू व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
