
ग्राहक जागरण दिंडी समारोपप्रसंगी सेलू येथे प्रतिपादन
सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्य अत्यंत कौतुकास्पद, दिशादर्शक व समाजोपयोगी असून समाजात जागरूक ग्राहक घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही संघटना करीत आहे, असे प्रतिपादन न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण काळे यांनी केले. ते येथे ग्राहक जागरण दिंडी अभियानाच्या समारोपप्रसंगी बोलत होते.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान परभणी जिल्ह्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने महिनाभर ग्राहक जागरण दिंडी अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा समारोप 31 डिसेंबर रोजी तहसील कार्यालय सेलू व अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन कन्या प्रशालेच्या सभागृहात ग्राहक प्रबोधन व दिंडी समारोप कार्यक्रमाने झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती निशा पाटील होत्या. प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे, प्रांत पर्यावरण प्रमुख डॉ. संगीता आवचार, प्रांत लीगल सेल प्रमुख अॅड. संजय केकान, प्रांत रोजगार आयाम प्रमुख किरण बोचरे, नायब तहसीलदार विजय मोरे, मदन यादव, पुरवठा निरीक्षक ऋषिकेश पौळ, जिल्हाध्यक्ष गुलाबराव शिंदे, तालुकाध्यक्ष सतीश जाधव, सुनील गायकवाड, मंजुषा कुलकर्णी, सिद्धार्थ गायकवाड, शुकाचार्य शिंदे, यांच्यासह अन्न व औषध प्रशासन, वजन-मापे विभाग, महावितरण, गॅस एजन्सी, तहसील कार्यालय, नूतन कन्या प्रशाला येथील कर्मचारी तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जिल्हाभरातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी डॉ. संगीता आवचार म्हणाल्या की, जीवन जगत असताना उपभोगावर संयम ठेवून जागरूक राहणे आवश्यक आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या कार्यामुळे ग्राहकांमध्ये त्यांच्या हक्कांची जाणीव निर्माण होत आहे.
अॅड. संजय केकान यांनी फसवणूक व अन्यायाविरोधात आवाज उठविणे तसेच जागरूक, जबाबदार व संस्कारयुक्त ग्राहक घडविण्याचे कार्य ग्राहक पंचायत प्रभावीपणे करीत असल्याचे सांगितले.
डॉ. विलास मोरे म्हणाले की, ग्राहक जागरण दिंडी, जनजागृती अभियान, मार्गदर्शन शिबिरे, स्पर्धा व कायदेशीर साक्षरतेच्या माध्यमातून समाजातील ग्राहक चळवळीला बळ मिळत आहे.
अध्यक्षीय भाषणात श्रीमती निशा पाटील म्हणाल्या की, ग्राहक पंचायत करत असलेल्या विधायक कार्यामुळेच “ग्राहक राजा जागा होतो” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किर्ती राऊत तर प्रा. के.डी. वाघमारे यांनी आभार मानले.