
रायगड कॉर्नर ते रेल्वे गेट रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी — नागरिकांकडून प्रशासनाला निवेदन
सेलू | प्रतिनिधी — रायगड कॉर्नर ते रेल्वे गेट सेलू हा अत्यंत रहदारीचा मार्ग असून, या रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी, नगर परिषद सेलू यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या रस्त्यालगत शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग तसेच दुकाने मोठ्या प्रमाणावर असल्याने विद्यार्थ्यांसह पादचारी लोकांचा सतत वावर असतो. मात्र, वाहनचालक बेदरकारपणे व अतिवेगाने वाहने चालवत असल्यामुळे अनेकदा अपघात घडून निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे तसेच काही जण अपंग झाले आहेत.
निवेदनात पुढे नमूद केले आहे की, या रस्त्यावर गतिरोधकांची तातडीने उभारणी करणे अत्यावश्यक आहे. यापूर्वी अनेक वेळा लेखी व तोंडी मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जर तात्काळ कार्यवाही न झाल्यास 7 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता दुधना नदी मोरेगावच्या पात्रात सेलूवासीयांकडून ‘जलसमाधी आंदोलन’ करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर जयसिंग शेळके, मोहन मोरे, विनोद धापसे, कृष्णा पडघन, वसंत आवटे, निशिकांत रोडगे, शाम रोडगे, उत्तम लोखंडे, उध्दव डूबल, मारोती ढोले आदींच्या स्वाक्षऱ्या असून, प्रत अभियंता, राष्ट्रीय महामार्ग 548 बी, जालना यांनाही माहितीस्तव देण्यात आली आहे.