
परभणी (प्रतिनिधी) :
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील यांच्या परभणी जिल्हा दौऱ्यादरम्यान माजी आमदार विजय भांबळे यांनी भेट घेऊन जिंतूर तालुका व सेलू तालुक्यातील वालूर व कुपटा मंडळांचा अतिवृष्टीग्रस्त भागात तातडीने समावेश करावा अशी मागणी केली.
गेल्या जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत सतत पाऊस, ढगफुटी व अतिवृष्टीमुळे जिंतूर व सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद, हळद, ऊस व फळबाग यांसारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे व मजुरीवर मोठा खर्च केलेला असून उभ्या पिकांची मुळे सडून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

शासनाने नुकतेच नुकसानग्रस्त भागासाठी निधी मंजूर केला असला तरी वालूर व कुपटा मंडळांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे येथील शेतकरी मदतीपासून वंचित राहतील, अशी खंत व्यक्त करून भांबळे यांनी या मंडळांचा तातडीने समावेश करून शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान देण्याची मागणी केली.

या प्रसंगी विश्वनाथ राठोड, अजयराव चौधरी, लक्ष्मणराव बुधवंत, मुरलीधर मते, बाळासाहेब घुगे, अभिनय राऊत, विठ्ठलराव घोगरे, कृष्णकांत देशमुख, केशवराव बुधवंत, गणेशराव इलग, पुरुषोत्तम पावडे, चंद्रकांत गाडेकर, गजानन वऱ्हाड, शरदराव अंभूरे, सुधाकर, आप्पासाहेब डख, मदन डोंबे, अविन करून नागरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.