सेलू तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार; कसूरा नदीला पूर, वाहतूक ठप्प

सेलू (प्रतिनिधी) :
सेलू तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. बुधवारी (दि. 17 सप्टेंबर) दुपारी अचानक पावसाचा जोर वाढल्याने कसूरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढली. दुपारी चार वाजल्यापासून सेलू–पाथरी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने पुलावर बंदोबस्त तैनात करून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

अर्जुन नगरात घरात शिरले पाणी..

सेलू शहरातील अर्जुन नगर परिसरात पाणी शिरल्याने अनेक घरांतील संसारोपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे नागरिकांनी मोठ्या कष्टाने कमावलेले घरगुती साहित्य, धान्यसाठा व वस्त्रप्रावरणे भिजून खराब झाली आहेत. नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.

नदीकाठच्या शेतात पाणीच पाणी..

कसूरा नदीच्या पुरामुळे देऊळगाव गात, धामणगाव, गव्हाण, बोरगाव आणि आधी गाव परिसरातील शेतात पाणी साचले आहे. शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे पिके पाण्याखाली गेली असून, आता नदीच्या पुरामुळे शेतीमाल पूर्णपणे वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

पोलिस प्रशासनाचा बंदोबस्त. .

पूरस्थिती लक्षात घेऊन कसूरा नदीच्या पुलावर पोलिसांनी प्रशासनाचे अन्वर शेख,मधुकर जाधव यांनी पहारा ठेवला आहे. कोणताही अपघात किंवा जीवितहानी होऊ नये यासाठी वाहनधारकांना प्रतिबंध करण्यात येत आहे. पोलिसांनी वारंवार नागरिकांना नदीपात्रात जाण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे.

शेतकरी हवालदिल – मदतीची आस

निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. मेहनतीने लावलेली पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर वर्षभराचे स्वप्न उध्वस्त होत आहे. आता शेतकऱ्यांना एकच प्रश्न सतावतोय – सरकारकडून मदत मिळणार का? मिळणार तर कधी आणि किती?

सततचा पाऊस चिंता वाढवणारा..!

तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरी भागात रस्ते जलमय झाले असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button