गुन्हे तपास आता अधिक वेगवान – परभणीत फॉरेन्सिक व्हॅन व इन्वेस्टीगेशन बाईक दाखल

परभणी (जि. परभणी) – परभणी जिल्ह्यातील गुन्हे तपास अधिक सक्षम, वेगवान आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. पोलीस अधीक्षक कार्यालय, परभणी येथे आयोजित समारंभात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व इन्वेस्टीगेशन आय-बाईक या अत्याधुनिक सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. या सोयींच्या मदतीने गुन्हे तपास प्रक्रियेला नवी गती मिळणार असून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होणार आहे.

या प्रसंगी बोलताना पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सांगितले की, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व आय-बाईकच्या साहाय्याने घटनास्थळीच न्यायवैज्ञानिक तज्ञांची मदत उपलब्ध होईल. यामुळे पुरावे तात्काळ, अचूक व काटेकोर पद्धतीने संकलित करता येतील. पूर्वी घटनास्थळावरून पुरावे प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी वेळ लागत होता, परंतू या अत्याधुनिक यंत्रणेच्या मदतीने गुन्हे उकलण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि विश्वासार्ह होणार आहे.

मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये अत्याधुनिक तांत्रिक साधनसामग्री उपलब्ध असून, डिजिटल पुरावे, बोटांचे ठसे, डीएनए, मोबाईल डेटा तपास यांसारख्या विविध तपास प्रक्रियांना याचा थेट फायदा होईल. तसेच इन्वेस्टीगेशन आय-बाईक ही तपास यंत्रणा घटनास्थळी लवकर पोहोचून प्राथमिक चौकशी आणि पुरावे गोळा करण्यात पोलिसांना मदत करेल.

या उपक्रमामुळे जिल्ह्यातील नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होईल, तसेच गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हा उपक्रम मैलाचा वाटा ठरणार असल्याचे मानले जात आहे. या कार्यक्रमाला परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. मेघना दीदी साकोरे मोडीकर,परभणी जिल्हाधिकारी मा. संजय चव्हाण पोलीस अधीक्षक मा. रवींद्र सिंह परदेशी व इतर परभणी जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button