
मानवत (जि. परभणी) – शेतावर असलेल्या कर्जाच्या ताणतणावातून एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली.
मयत शेतकरी गोविंद काळुराम मुळक (वय 35, जात मराठा, रा. मानोली, ता. मानवत, जि. परभणी) याने बँकेच्या कर्जाच्या ओझ्यामुळे नैराश्यातून जीव घेण्याचा निर्णय घेतला. त्याला तत्काळ उपचारासाठी सरकारी दवाखाना, परभणी येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत शेतकऱ्याचे शिक्षण पाचवी पर्यंत झाले होते. तो विवाहित असून त्याच्या नावे शेती नव्हती. त्याच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतावर एसबीआय बँकेचे पाच लाख रुपयांचे कर्ज होते. या कर्जाची परतफेड कशी करावी याच्या नैराश्यातून त्याने विषारी औषध प्राशन केले.
या प्रकरणी खबर देणारे म्हणजे त्यांचा भाऊ मुंजा काळुराम मुळक (वय 25, व्यवसाय शेती, रा. मानोली) यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली.
या घटनेवर पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार जानगर करीत आहेत.
👉 ही आत्महत्या घटना पुन्हा एकदा शेतकऱ्यांवरील कर्जबाजारीपणाचा प्रश्न अधोरेखित करत आहे..!