
चारठाणा : रात्रीच्या गस्तीवर असलेल्या चारठाणा पोलिसांनी रायखेडा शिवारात संशयास्पदरीत्या जाणारा आयशर पकडून त्यातून अवैधरीत्या वाहतूक करण्यात येत असलेल्या दहा पशुधनांची सुटका केली. या कारवाईत जनावरे व आयशर असा एकूण ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संभाजीनगर-नांदेड राज्य महामार्गावरील रायखेडा शिवारात शनिवारी (२३ ऑगस्ट) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चारठाणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी उद्धव माने, खरात तसेच दोन होमगार्ड रात्रीची गस्त घालत होते. यावेळी जालन्याहून वसमतकडे जाणारा एमएच ०२ ईआर ६४०५ क्रमांकाचा आयशर संशयास्पद स्थितीत आढळून आला.
पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता आयशरमध्ये कोंबून दहा पशुधन भरल्याचे आढळून आले. चालकासह वाहनातील अन्य दोन व्यक्तींकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी आयशर ताब्यात घेऊन चारठाणा पोलीस ठाण्यात आणला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी दहा पशुधनांची सुटका करून त्यांना इटोली येथील गोशाळेत सुरक्षितरीत्या पाठविले. जप्त केलेल्या जनावरांची अंदाजे किंमत चार लाख रुपये, तर जुना वापरलेला आयशरची किंमत चार लाख रुपये, असा एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उद्धव माने यांच्या फिर्यादीवरून रमेश सुरेश गायकवाड (वय ३८, रा. गणेशपूर, ता. वसमत), आदेश गौतमराव मस्के (वय २४, रा. आंबेडकर नगर, वसमत) आणि साजिद वहाब शेख (रा. वसमत) या तिघांविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमातील कलम ५(अ), ५(ब), ९, प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियमातील कलम ११(१)(ड), मोटार वाहन कायद्यातील कलम १२५(इ) तसेच अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघ पुढील तपास करीत आहेत.