सेलू तालुक्यात दोन शेतांत गांजाची लागवड उघड; २ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त

कुंभारी शिवारातील कारवाई; दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल

सेलू | प्रतिनिधी सतिश आकात

सेलू तालुक्यातील कुंभारी शिवारात दोन शेतांमध्ये बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सेलू पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजाची एकूण सात झाडे जप्त करण्यात आली असून, त्यांचे एकूण वजन ५ किलो ८० ग्रॅम आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत २ लाख ४५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान कुंभारी शिवारातील गट क्रमांक १२१ मधील दोन शेतांमध्ये ही कारवाई करण्यात आली. जिजाभाऊ बन्सी चव्हाण (रा. नागठाणा) यांच्या शेतातून गांजाची चार झाडे जप्त करण्यात आली. या झाडांचे मुळासह वजन ३ किलो ६९० ग्रॅम असून, त्यांची किंमत १ लाख ७५ हजार रुपये आहे.

तसेच तुळशीराम मुंजाजी शिंदे (रा. कुंभारी) यांच्या शेतातील हळदीच्या पिकामध्ये गांजाची तीन झाडे आढळून आली. या झाडांचे मुळासह वजन १ किलो ३९० ग्रॅम असून, त्यांची किंमत ७० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

दोन्ही शेतांमधून जप्त करण्यात आलेल्या गांजाच्या झाडांचे एकूण वजन ५ किलो ८० ग्रॅम असून, एकूण किंमत २ लाख ४५ हजार रुपये आहे. या प्रकरणी संबंधित दोन्ही आरोपींविरुद्ध अमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act), १९८५ च्या कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत करीत आहेत. गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button