115 कोटींच्या कामातील दत्तनगर-रेल्वे पूल ते आठवडी बाजार रस्ता तात्काळ सुरू करा.!

सेलू : शहरातील दत्तनगर भागातील रस्त्याची दुरवस्था झाली असून, पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे 115 कोटी रुपयांच्या विकासकामांतर्गत मंजूर असलेला रेल्वे पूल ते आठवडी बाजार हा रस्ता तात्काळ सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी मुख्याधिकारी, नगर परिषद सेलू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, दत्तनगर भागातील रस्त्यावर अनेक वर्षांपासून पावसाचे पाणी साचत आहे. रस्त्याची अवस्था खराब झाल्याने पुरुष, महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच परिसरात डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत असून परिसरात अस्वच्छ वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे 115 कोटी रुपयांच्या विकासकामांतर्गत मंजूर असलेल्या रेल्वे पूल ते आठवडी बाजार या रस्त्याचे काम येत्या 15 दिवसांत सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर शेख नय्यूम शेख मुनीर, लक्ष्मण बागल, शिवाजी भरके, गणेश आवडे आणि रामा चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button