पोलिसांच्या वाहनास अडवून तलवारीने हल्ल्याचा थरार; सेलूत भरदिवसा सिनेमासारखा प्रकार..

सेलू

सेलू शहरात 22 एप्रिल रोजी भरदिवसा घडलेल्या एका थरारक घटनेने शहर हादरले. सरकारी दवाखान्याच्या मुख्य गेटजवळ पोलिसांच्या शासकीय वाहनास अडवून आरोपींनी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 208/2026 दाखल करण्यात आला आहे. विष्णु ढोले, राजीक नुर कुरेशी, आश्वीन मधुकर साळवे आणि त्यांच्यासोबत तीन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांसह भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

घटनेच्या वेळी पोलिसांनी यापूर्वीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या बुध्दभूषण ढगे, रविंद्र पाडकराव आणि अजय उघडे (सर्व रा. गायत्री नगर, सेलू) यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय वाहनातून सरकारी दवाखान्याकडे नेले जात होते. दुपारी सुमारे 12.45 वाजताच्या सुमारास वाहन दवाखान्याच्या मुख्य गेटजवळ पोहोचताच अचानक काही युवकांनी मोटारसायकल आणि स्कुटी आडवी लावून वाहनाचा मार्ग रोखला.क्षणातच वातावरण तंग झाले. याच वेळी विष्णु ढोले हातात तलवार घेऊन पुढे आला आणि वाहनातील आरोपींवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करू लागला. प्रसंग अगदी एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा वाटत होता. मात्र पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाडस दाखवत त्याचा हात पकडला आणि मोठा अनर्थ टळला.दरम्यान, इतर आरोपींनीही पोलिसांशी झटापट करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. काही काळ परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणली.घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घायवट यांच्याकडे सोपविला आहे.


सुसंस्कृत आणि शैक्षणिक शहर म्हणून ओळख असलेल्या सेलूत अशा प्रकारच्या घटना वारंवार घडू लागल्याने नागरिकांमध्ये भीती आणि नाराजी व्यक्त होत आहे. मागील काही महिन्यांतील वाढती गुन्हेगारी पाहता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती उरलेली नसल्याची चर्चा असून, पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button