
सेलू, प्रतिनिधी
तालुक्यातील म्हाळसापूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नामदेव आवटे यांच्या नावे सहा मतांनी ठराव संमत करण्यात आला असून, त्यांची निवड करण्यात आली आहे.या संस्थेमध्ये एकूण १२ संचालक आहेत. मात्र, यापैकी दोन संचालकांचे निधन झाले असल्याने १० पदे अस्तित्वात आहेत. आज पार पडलेल्या या विशेष बैठकीला ४ संचालक गैरहजर होते, तर उर्वरित ६ संचालकांनी एकत्र येत नामदेव आवटे यांच्या बाजूने कौल दिला.यावेळी बैठकीत सत्यभामा आवटे यांनी सूचक म्हणून नाव सुचवले, तर सोसायटीचे चेअरमन रामभाऊ आवटे यांनी या प्रस्तावाचे अनुमोदन केले. बहुमताने मिळालेल्या या पाठिंब्यामुळे नामदेव आवटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
या निवडीनंतर नामदेव आवटे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, “ज्या संचालकांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला ही संधी दिली, त्या सर्व संचालकांचे मी मनापासून आभार मानतो. संस्थेच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी कटिबद्ध राहीन.”
या निवडीबद्दल नामदेव आवटे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
