
प्रतिनिधी सतिश आकात: सेलू तालुक्यात बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर जमावाने दगडफेक करून शासकीय कामात अडथळा आणल्याची गंभीर घटना रविवारी (दि.29 मार्च 2026) सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास रेहमान नगर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेहमान नगर येथील नाल्यावरील पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भागीनाथ घायवट यांच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकली. मात्र, कारवाईदरम्यान आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून पोलिसांवर दगडफेक केली. तसेच गोवंश कत्तल प्रकरणी सुरू असलेली कारवाई रोखण्याचा प्रयत्न करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

यावेळी अंदाजे 100 किलो गोवंश मांस, कातडी, मुंडके तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारे सुऱ्या, कुऱ्हाडी, तराजू काटा व इतर साहित्य जमावाने पळवून नेऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी रज्जाक जैरुद्दीन कुरेशी, मालजी चांदसाहेब कुरेशी, तला मालजी कुरेशी, मोबीन उर्फ गठुळा मुसा कुरेशी, जावेद नड्डू कुरेशी, सादिक रज्जाक कुरेशी यांच्यासह 15 ते 20 अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट 1932 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशाने करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शाकीर शेख करीत आहेत.
दरम्यान, गेल्या दोन ते तीन महिन्यांत सेलू तालुक्यात गोवंश कत्तल प्रकरणी वारंवार कारवाया होत असूनही अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे आरोपी प्रशासनालाही जुमानत नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
सध्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात असली तरी या दगडफेक प्रकरणातील उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरत आहे. शांत आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या सेलू शहराला अशा समाजकंटकांमुळे गालबोट लागल्याची भावना व्यक्त होत आहे.