
सेलू : “तुका म्हणे जशी तशी करावी सेवा, समर्थांच्या देवा पायाशी” या संतवचनाचा प्रत्यय देत सेलू येथे सुरू असलेल्या फिरता पारायण सांगता सोहळ्यानिमित्त मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक १६ व १७ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर आयोजित करण्यात आले असून भाविक व नागरिकांना मोफत तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या शिबिरामध्ये आयुर्वेदातील सुपरफास्ट उपचार पद्धती ‘विद्धकर्म’ आणि ‘अग्निकर्म’ यांद्वारे तपासणी व उपचार केले जाणार आहेत. यासाठी पुणे, नाशिक, नागपूर, गडचिरोली, नांदेड आणि जालना या महाराष्ट्रातील विविध भागांतून डॉ. मंथन लोकुलवार यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांची टीम सेवेसाठी उपस्थित राहणार आहे.
शिबिरामध्ये वाताचे आजार, गुडघेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी, पोटाचे आजार, मुतखडा तसेच इतर विविध आजारांवर नाडी परीक्षण करून मोफत उपचार केले जाणार आहेत.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व माऊलीच्या सेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.