तहसील कार्यालयातून जप्त ट्रॉलीच चोरीला; प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.!

प्रतिनिधी सतिश आकात
सेलू : तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करून जप्त केलेली वाहनेही आता सुरक्षित राहिली नाहीत, अशी परिस्थिती सेलू येथे निर्माण झाली आहे. तहसील कार्यालयाच्या आवारातूनच जप्त केलेली ट्रॅक्टर ट्रॉली चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यामुळे प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 125/2026 कलम 303(2) बीएनएस अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून मोरेगाव येथील ग्रामसेवक राधिका गंगाधरराव गरुड यांनी तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 9 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता सहाय्यक महसूल अधिकारी राऊत यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात जप्त वाहनांची पाहणी केली असता 11 फेब्रुवारी 2026 रोजी जप्त केलेली विनाक्रमांकाची लाल रंगाची ट्रॅक्टर ट्रॉली तेथे असल्याचे दिसून आले. मात्र दुसऱ्या दिवशी 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पुन्हा पाहणी केली असता सदर ट्रॉली जागेवर आढळून आली नाही.
सदर ट्रॉली सोडण्याचा कोणताही आदेश तहसील कार्यालयातून झालेला नसताना अंदाजे 70 हजार रुपये किंमतीची ट्रॅक्टर ट्रॉली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस हवालदार पुलाते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, सरकारी कार्यालयाच्या आवारातूनच जप्त वाहने चोरीला जाण्याचा हा प्रकार पहिलाच नसल्याचे सांगितले जात आहे. याआधीही अशा घटना घडल्याची चर्चा असून त्यामुळे वाळू माफियांची दहशत वाढली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सरकारी कार्यालयातूनच जप्त वाहनांची चोरी होत असेल तर सामान्य नागरिकांच्या मालमत्तेची सुरक्षा कोण करणार, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button