
स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांचे प्रतिपादन
सेलू : प्रत्येकाच्या मनात आनंदाचा झरा वाहतो. हा आनंदाचा झरा वाहता ठेवा.अहंकारी माणसं कुणालाही आवडत नाहीत. विनम्रता आणि गुणवत्ता दुसऱ्यांच्या हृदयात जागा निर्माण करते. म्हणून मी पणा सोडा; विनम्र वागायला शिका, असे प्रतिपादन स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज यांनी केले.
सेलू शहरातील अलंकापुरी नगरीत आयोजित फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात तिसऱ्या दिवशी शनिवारी, १४ मार्च २०२६ रोजी ‘महाभारत संदेश कथा’ गुंफताना स्वामीजी बोलत होते.
याप्रसंगी नगराध्यक्ष मिलिंद सावंत, मुकेश हरिभाऊ बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे आणि बिहाणी परिवारातर्फे स्वामीजींचे पूजन करण्यात आले.
स्वामीजी म्हणाले, की खरी कीर्ती कोणीही पुसून काढू शकत नाही. आपले कर्तृत्व असे सिद्ध करा माणसं स्वतः हून आपल्या पाठिशी उभे राहावेत. सामुहिक पुरूषार्थाने मोठमोठे कार्य सिद्धीस जातात. हा संदेश महाभारत कथेतून मिळतो.

ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या पारायणाला भाविकांची अलोट गर्दी
अलंकापुरीनगरीत रोज सकाळी ७.३० ते १० या वेळेत सामुहिक ज्ञानेश्वरी पारायण होत आहे. यामध्ये २१ हजारांहून अधिक भाविक ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण करत आहेत.
संतांनी समतेची शिकवण दिली: रामराव महाराज हेंडगे
सर्व संतांनी समतेचा संदेश दिला. समर्पण भावनेने कर्म करायला शिकविले. माणसासोबत माणसासारखे वागावे हे सांगितले. असे प्रतिपादन वेदांताचार्य रामराव हेंडगे महाराज यांनी केले. शनिवारी सकाळी आयोजित हरी किर्तन सेवेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, ” एक तरी ओवी अनुभवावी असे म्हटले जाते. जीवन सर्वार्थाने सार्थकी लावायचे असेल तर आपण ज्ञानेश्वरी पारायण केले पाहिजे. सर्व संतांची वचने अंगीकारले पाहिजेत. तरच आपण जीवनात सुखी होऊ शकतो. ” असेही ते म्हणाले.
धार्मिक पुस्तकांची मोठी विक्री
अलंकापुरीनगरीत आयोजित फिरता ज्ञानेश्वरी सांगता पारायण सोहळा स्थळी असलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या दिंडीतील पेठभाबळगाव ता.पाथरी येथील मानाचा अश्व आणि पालखीचेही दर्शन भाविक घेत आहेत. सोबतच पुस्तक दालनातून ज्ञानेश्वरी ग्रंथ, संत तुकाराम गाथा आणि विविध धार्मिक पुस्तकांची मोठ्या प्रमाणात भाविक खरेदी करत आहेत.