
सेलू : शहरातील सहयाद्री नगर परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा व कपाट फोडून तब्बल 6 लाख 82 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.45 ते दुपारी 4.45 वाजण्याच्या दरम्यान घडली.

याबाबत पोलीस स्टेशन सेलू येथे गुन्हा क्रमांक 84/2026 अन्वये कलम 305 (A), 331(3) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी उमेश कुंडलीकराव कास्टे (वय 34, व्यवसाय वकील, रा. सहयाद्री नगर, सेलू) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीने घराचे लॉक तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचा दरवाजा तोडून लॉकर व ड्रॉवर उघडत त्यामधील 4 तोळ्यांच्या पाटल्या, प्रत्येकी 1 तोळ्याच्या दोन अंगठ्या, लहान मुलाचे 5 ग्रॅम वजनाचे कानातले असा 5 लाख 62 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज तसेच 1 लाख 20 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 6 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या प्रकरणी 10 फेब्रुवारी रोजी रात्री 10.37 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. मा. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शाकीर शेख यांच्याकडे सोपविण्यात आला.

गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत, शाकीर शेख, पोलीस हवालदार नबू शेख, पोलीस कॉन्स्टेबल दुबे, बारवकर आदींनी विशेष मेहनत घेतली. तपासादरम्यान रवींद्रसिंग टाक (वय 22, रा. मानवत) यास मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेमुळे सहयाद्री नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी घर सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पुढील तपास सुरू आहे.