नूतनच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थिनींचा राष्ट्रीय सोसायटी तर्फे गौरव

सेलू तालुका प्रतिनिधी : नूतन महाविद्यालय, सेलू येथील सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) विभागाने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची व विद्यार्थ्यांच्या प्रगतीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यासारखी कामगिरी केली आहे. श्री संत जनाबाई एज्युकेशन सोसायटी, गंगाखेड यांच्या वतीने आयोजित “Recent Advances in Life Sciences” या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय स्तरावरील परिषदेत महाविद्यालयातील पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

ही राष्ट्रीय परिषद दि. 24 जानेवारी 2026 रोजी Arts, Commerce & Science College, गंगाखेड (जिल्हा परभणी) येथे अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाली. या परिषदेमध्ये देशभरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, संशोधक व तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता. नूतन महाविद्यालय, सेलू येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील एकूण 14 विद्यार्थी (04 मुले व 09 मुली) या परिषदेत सहभागी झाले होते.

या परिषदेदरम्यान सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील कु. पोटे दिपाली तुकाराम (तृतीय वर्ष) व कु. पठाण खानसा (द्वितीय वर्ष) या विद्यार्थिनींनी आपल्या शैक्षणिक गुणवत्ता, सातत्यपूर्ण अभ्यास, संशोधनात्मक दृष्टिकोन व एकूणच शैक्षणिक प्रगतीच्या जोरावर Microbiologist Society of India (MSI) यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा Best Student Award पटकावला.

राष्ट्रीय स्तरावर प्राप्त झालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल सदर विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ आमदार मा. विक्रम काळे यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक करण्यात आले. हा गौरव नूतन महाविद्यालय, सेलू येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला असून विभागातील इतर विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणादायी व दिशादर्शक ठरत आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल विजेत्या विद्यार्थिनींसह त्यांच्या मार्गदर्शक प्राध्यापकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, सचिव प्राचार्य डॉ. व्ही. के. कोठेकर, सहचिटणीस श्री जयप्रकाशजी बिहाणी, प्रशासकीय अधिकारी डॉ. शरद एस. कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. सी. राठोड, उपप्राचार्य डॉ. आर. एम. खाडप, IQAC समन्वयक डॉ. एन. एस. पद्मावत, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश कंठाळे यांनी डॉ. अमित कुलकर्णी व विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

सदर यशामुळे नूतन महाविद्यालय, सेलू येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाची शैक्षणिक परंपरा अधिक दृढ होत असून महाविद्यालयाच्या लौकिकात मोलाची भर पडली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button