
मुलींच्या सुरक्षेसाठी शिवसेनेचे निवेदन, पोलिसांकडे पाठपुरावा करण्याची विनंती

सेलू (प्रतिनिधी सतिश आकात) –
विद्यानगर परिसरातील शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने पूर्वी सुरू करण्यात आलेली विद्यानगर पोलीस चौकी पूर्ववत कार्यान्वित करावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व स्थानिक प्रतिनिधींनी केली आहे. यासंदर्भात शिवसेना व युवा सेनेच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
मुलींच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव शाळेच्या पाठपुराव्यानंतर तत्कालीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती रेणुका वागळे यांच्या हस्ते विद्यानगर पोलीस चौकीचे उद्घाटन करून ती सुरू करण्यात आली होती. मात्र सद्यस्थितीत या पोलीस चौकीवरील उद्घाटनाचा नामफलक फोडण्यात आला असून चौकी प्रत्यक्षात कार्यरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये व पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

ही पोलीस चौकी पुन्हा सुरू व्हावी यासाठी आपल्या स्तरावर पाठपुरावा करावा, अशी विनंती करणारे निवेदन नूतन कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका तसेच सेलू पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांना दिनांक 19 जानेवारी रोजी देण्यात आले.
यावेळी शिवसेना मा.तालुकाप्रमुख पवन राजे घुमरे यांच्यासह राहुल जाधव, सुशांत मोगल, रोहित चंडाले, कृष्णा वाघे, राजेश वायगुंडे, गुलाबराव खेडकर, एकनाथ सोळंके आदी शिवसेना व युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी विद्यानगर पोलीस चौकी तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.