
प्रतिनिधी सतिश आकात: सेलू पोलीस ठाणे हद्दीत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १८ जानेवारी २०२६ रोजी पहाटे २.१० वाजण्याच्या सुमारास मोरेगाव नदीच्या पुलाजवळ करण्यात आली.
याप्रकरणी रशिद लाल खाँ पठाण (वय २८, रा. आयेशा कॉलनी, सेलू) यास अटक करण्यात आली आहे. आरोपी हा कोणतीही शासकीय परवानगी न घेता, विनापरवाना अवैधरीत्या रेतीची वाहतूक करून शासनाचा महसूल बुडवण्याच्या उद्देशाने रेतीची चोरटी विक्री करत असल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून हिरव्या रंगाचा जॉन डिअर कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर (किंमत अंदाजे ५,००,००० रुपये), लाल रंगाची विना क्रमांकाची ट्रॉली (किंमत अंदाजे १,००,००० रुपये) तसेच ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास रेती (किंमत ५,००० रुपये) असा एकूण ६,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर शिवाजी दहीफळे (नेमणूक – उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सेलू) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे सेलू येथे गुन्हा रजिस्टर नंबर २४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८(७)(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची वेळ सकाळी ३.११ वाजता आहे.
ही संपूर्ण कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर दहीफळे, पोलीस अंमलदार घुगे व पोलीस अंमलदार पंकज आगाशे यांनी केली.
पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या आदेशाने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार सूर्यवंशी हे करत आहेत.
