
सेलू (प्रतिनिधी):
नूतन महाविद्यालय, सेलू येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘शाश्वत विकासासाठी युवक,जलसंधारण व्यवस्थापन आणि युवकांची भूमिका’ या विषयावर आधारित विशेष वार्षिक शिबिराचे मौजे रोहिना (ता. सेलू, जि. परभणी) येथे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले.महापुरुषांच्या विचारांची शिदोरी कार्यक्रमाचे उद्घाटक प्रसिद्ध साहित्यिक व कवी राजेंद्र दशरथ गहाळ यांनी वामनदादा कर्डक यांच्या ‘ आले महात्मा फुले मुलींनचे शिक्षण केले खूले हो ‘ या कवितेच्या ओळींनी भाषणाची सुरुवात केली. त्यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, राष्ट्रमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचे आवाहन केले.
गहाळ यांनी आपल्या प्रबोधनपर भाषणात “वाचाल तर वाचाल” हा संदेश देत महापुरुषांचे चरित्र वाचण्यावर भर दिला. “कर्ज काढून सण साजरे करू नका, घर आणि गाव स्वच्छ ठेवा,” असे सांगतानाच त्यांनी संत गाडगे महाराजांच्या स्वच्छतेच्या विचारांचे महत्त्व विशद केले. मोबाईलचा अतिवापर टाळून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देताना त्यांनी अन्सार शेख (रिक्षाचालकाचा मुलगा ते जिल्हाधिकारी) यांचा प्रवास मांडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. व्यासपीठावरील मान्यवरांचे मार्गदर्शन
कार्यक्रमाचे अध्यक्ष नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. व्ही. के. कोठेकर सर यांनी राष्ट्र विकासामध्ये विद्यार्थ्यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. युवक आणि युवतींनी शिबिराच्या माध्यमातून समाजकार्याची सांगड कशी घालावी , याबाबत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. सी. राठोड यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या आणि युवकांनी जलसंधारणाच्या कामात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. याप्रसंगी रोहिना गावच्या सरपंच अर्चना भारत इन्द्राके आणि शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष परमेश्वर रघुनाथ काष्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिर उद्घाटन सोहळ्यानंतर सरस्वती धनवंतरी डेंटल कॉलेज, परभणी डॉ.. निलेश सरोदे, डॉ. मृगाक्षी कंठाळे, डॉ. उमर, डॉ. रोहित व डॉ. शेजल यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य व दंत चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून विनामूल्य तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

प्रास्ताविक: डॉ. सुरेश उगले
पाहुण्यांचा परिचय: प्रा. शुभांगी नायकल, आणि डॉ. अर्चना पत्की सूत्रसंचालन: श्रद्धा गिराम तर आभार प्रदर्शन. डॉ. आर. जे. नाथानी यांनी मानले. शिबीर यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाधिकारी डॉ.सुरेश उगले डॉ.अर्चना पत्की ,डॉ. कीर्ती निराळवाड, अर्चना ठोंबरे, शुभांगी नायकल डॉ. विकास गवई तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.