
प्रतिनिधी सतिश आकात
येथील नूतन महाविद्यालयाच्या कला शाखेच्या माजी विद्यार्थिनी कु. अर्चना मोगरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एम.पी.एस.सी.) घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षक (पी.एस.आय.) पदी निवड मिळवली आहे. नाशिक येथे खडतर व शिस्तबद्ध असे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून त्या आता महाराष्ट्र पोलीस दलात सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या असून त्यांच्या या उज्वल यशामुळे महाविद्यालयासह सेलू परिसरात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल नूतन महाविद्यालयाच्या वतीने अर्चना मोगरे यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम राठोड हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजाराम झोडगे यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना अर्चना मोगरे यांनी विद्यार्थ्यांसमोर एम.पी.एस.सी. परीक्षेची तयारी, अभ्यासातील सातत्य तसेच प्रशिक्षण कालावधीत आलेले थरारक व प्रेरणादायी अनुभव मनोगताद्वारे मांडले. कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी, अभ्यासातील सातत्य आणि मोबाईलचा योग्य वापर केल्यास कोणतेही ध्येय गाठता येते, असा मौलिक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच आई-वडिलांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. उत्तम राठोड यांनी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग व ग्रंथालयाचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा, तसेच अर्चना मोगरे यांचा आदर्श घेऊन आपल्या अभ्यासाची दिशा ठरवावी, असे प्रतिपादन केले. त्यांनी अर्चना मोगरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कार्यक्रम अधिकारी डॉ. सुरेश उगले यांनी पुष्पगुच्छ देऊन अर्चना मोगरे यांचा गौरव केला. कार्यक्रमास महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. अनंत मोगल, डॉ. विकास गवई, प्रा. हनुमान व्हरगुळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्याम आवटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अनंत मोगल यांनी केले.

अर्चना मोगरे यांच्या या यशामुळे नूतन महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या कार्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे.