लोकशाहीच्या निकालावरच प्रश्नचिन्ह? सेलू नगरपरिषद निवडणूक निकालावर संशयाची धूसर सावली.!

सेलू नगरपरिषद निवडणूक 2025 : ईव्हीएम व संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती मागणारे उमेदवारांचे निवडणूक आयोगाला पत्र; शहरात चर्चांना उधाण

सेलू नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निकालाबाबत संशय व्यक्त करत विविध प्रभागांतील उमेदवार व नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती मागणारे पत्र दिले आहे. निवडणुकीच्या सूचनेपासून ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकतेच्या दृष्टीने उपलब्ध करून देण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

उमेदवारांनी मागितलेल्या माहितीत—निवडणूक जाहीर झाल्यापासून निवडून आलेले सर्व प्रभागनिहाय उमेदवार व नगराध्यक्षाची माहिती, निवडणुकीसाठी आलेल्या सर्व ईव्हीएम मशीनचे क्रमांक, मतदानपूर्व प्रात्यक्षिकासाठी वापरलेल्या मशीनचा तपशील व त्यावेळचे पंचनामे, मतदानाच्या दिवशी कोणत्या बूथवर कोणती मशीन ठेवली याचा पंचनामा, मतदानानंतर मशीन सील केल्याचे पंचनामे, निकाल जाहीर होण्यास विलंब झाल्याने स्ट्रॉंगरूममध्ये ठेवलेल्या सर्व मशीनची माहिती, मतमोजणीवेळी प्रभागनिहाय वापरलेल्या मशीनचे क्रमांक, मतमोजणीपूर्वी सील उघडताना केलेले पंचनामे तसेच 3 डिसेंबर 2025 ते 21 डिसेंबर 2025 या कालावधीतील स्ट्रॉंगरूम व मतमोजणी केंद्रांचे सीसीटीव्ही फुटेज—या सर्व बाबींचा समावेश आहे.

दिनांक 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला असला, तरी काही उमेदवारांना हा निकाल संशयास्पद वाटत असल्याचा दावा करण्यात आला आहे. समाजमाध्यमे व विविध दैनिकांमधून आलेल्या बातम्यांमुळे हा संशय अधिक बळावल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया व निकालाच्या विरोधात वरिष्ठ न्यायालय व उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीसाठी तातडीने माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत मतदाराचा कौल अंतिम मानला जातो. मात्र सेलू नगरपरिषद निवडणूक 2025 च्या निकालानंतर हाच कौल आता संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र दिसत आहे. निवडणूक आयोग व प्रशासनाने जाहीर केलेल्या निकालावरच अनेक उमेदवारांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने सेलूच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

निवडणूक जाहीर झाल्यापासून ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक होती का? ईव्हीएम मशीनची हालचाल, प्रात्यक्षिकासाठी वापरलेली यंत्रणा, मतदानाच्या दिवशी बूथनिहाय मशीनचे वाटप, सीलिंग-अनसीलिंगचे पंचनामे, स्ट्रॉंगरूममधील सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही फुटेज—या सर्व बाबींबाबत उमेदवारांनी थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे माहितीची मागणी केली आहे.

विशेष म्हणजे 3 डिसेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत निकाल लांबवल्यानंतर स्ट्रॉंगरूममध्ये ठेवलेल्या ईव्हीएमबाबत “नेमके काय घडले?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. मतमोजणीपूर्वी सील उघडताना नेमका पंचनामा कसा झाला, कोणकोणत्या प्रभागासाठी कोणती मशीन वापरली गेली, याची स्पष्ट माहिती मिळावी अशी मागणी होत आहे.

समाजमाध्यमे व दैनिकांमधून आलेल्या बातम्यांमुळे संशयाची धग आणखी वाढली असून, “लोकशाहीत निकाल अंतिम असतो, पण तो पारदर्शक नसेल तर?” असा सवाल आता सामान्य नागरिकही विचारू लागला आहे. काही उमेदवारांनी तर या संपूर्ण प्रक्रियेविरोधात वरिष्ठ न्यायालय व उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्धार जाहीर केला आहे.

या घडामोडींमुळे सेलू शहरात चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे निवडणूक आयोग व प्रशासनावर विश्वास ठेवणारा वर्ग, तर दुसरीकडे “सर्व माहिती समोर आली पाहिजे” अशी ठाम भूमिका घेणारे उमेदवार—या संघर्षातून लोकशाहीच्या विश्वासार्हतेची कसोटी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी सेलू यांच्याकडे खालील उमेदवारांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी अर्ज दाखल केला आहे
या तक्रार अर्जावर सही करणाऱ्या उमेदवारांमध्ये—सय्यद मुस्ताक सय्यद रब्बानी (प्रभाग 11 ब), नगराध्यक्षपदाचे उमेदवार ढोले प्रशांत दगडू,शेख बिस्मिल्ला (प्रभाग 3 ब), लक्ष्मी साळवे (7 अ), सय्यद हमीद दादा मिया (7 ब), प्रदीप धापसे (1), शेख आयुब (2 ब), विनोद धापसे (1), शेख उपकार बेगम आयुब (12), पठाणी असेरखान (4), रघुनाथ बागल,साळवे प्रवीण दयानंद, उघडे रामाकिशन (5 अ व ब), ढोले प्रीती प्रशांत, कांताबाई दगडू ढोले (7), अभय महाजन (5 ब), ज्योती गजानन बागल (13), स्वप्नील नाईकवाडे, समीर नाईकवाडे (प्रभाग 1 ब), S.D डंबाळे (7 ब), काशिनाथ जिजाभाऊ सदावर्ते (7 ब) व राजाराम काळे आदींचा समावेश आहे.

उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी ही माहिती तातडीने देण्याची मागणी केली आहे.
या घडामोडींमुळे सेलू शहरात निवडणूक निकालाबाबत जोरदार चर्चा सुरू असून, नागरिकांमध्येही विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. निवडणूक प्रशासन यावर कोणती भूमिका घेते आणि मागितलेली माहिती केव्हा उपलब्ध करून देते, याकडे सेलूकरांचे लक्ष लागले आहे.

याचे उत्तर निवडणूक प्रशासनाच्या पुढील भूमिकेतूनच मिळणार असून, सेलूकरांचे लक्ष त्याकडे लागले आहे….

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button