
भाजपचे १४ नगरसेवक विजयी; काँग्रेस ७, शिवसेना (शिंदे गट) ४ तर १ अपक्ष
सेलू नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत नगर परिषदेसह नगराध्यक्षपदावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या झालेल्या लढतीत भाजपचे उमेदवार मिलिंद ज्ञानदेव सावंत यांनी काँग्रेसचे उमेदवार आत्माराम साळवे यांचा ३१७ मतांनी पराभव करत नगराध्यक्षपदावर विजय मिळवला.
३ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी मतदान पार पडले होते. आज सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात कडक पोलीस बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे मिलिंद सावंत यांना १३,९६० मते, काँग्रेसचे आत्माराम साळवे यांना १३,६४३ मते, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार अॅड. प्रशांत ढोले यांना १,१५६ मते मिळाली. अखेर सावंत यांनी साळवे यांचा ३१७ मतांनी पराभव करत विजयाची माळ गळ्यात घातली.
नगरसेवक पदावरही भाजपची सरशी
२६ जागांच्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही भाजपने आपली ताकद दाखवत १४ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले. काँग्रेसला ७, शिवसेना (शिंदे गट) ला ४, तर १ जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. त्यामुळे सेलू नगर परिषदेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
विजयाचा जल्लोष शहरात मिरवणूक
निकाल जाहीर होताच तहसील कार्यालय परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत “भारतीय जनता पक्षाचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विजयी उमेदवारांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली असून ठिकठिकाणी हार-फेटे घालून स्वागत करण्यात आले.
विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा
गेल्या तीन वर्षांपासून नगर परिषदेवर प्रशासक राजवट होती. आता लोकनियुक्त नगर परिषद अस्तित्वात आल्याने रखडलेली विकासकामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शहराच्या पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि नागरी सुविधा यांना प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाला बळ..
राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर–सेलू मतदारसंघातील दोन्ही नगरपालिकांमध्ये पहिल्यांदाच भाजपने भरीव यश मिळवले आहे. या विजयामुळे राजकीय वर्तुळात पालकमंत्र्यांच्या कार्यकौशल्याचे आणि संघटन क्षमतेचे पुन्हा एकदा कौतुक होत असून, आगामी काळात जिल्ह्यात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.