सराईत गुन्हेगार सेलू पोलिसांच्या तावडीतून फरार..; पाठलाग करूनही पोलिसांना अपयश.!

@ न्यायालयात हजर करण्यापूर्वीच आरोपी फरार, आरोपीवर नवीन गुन्हा; पोलीसांची शोध मोहीम सुरूच

सेलू शहरात अभियोगासाठी न्यायालयात हजर करण्याच्या तयारीत असताना एका २६ वर्षीय सराईत आरोपीने हातकडीसह पलायन केल्याची धक्कादायक घटना बुधवार, १० डिसेंबर रात्री ९:१६ वाजता घडली आहे.

ज्ञानेश्वर शंकर पवार (वय २६, रा. राजीव गांधी नगर, सेलू) असे आरोपीचे नाव आहे. हा आरोपी जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान, सेलू पोलीस ठाण्यात दाखल गुरनं ३५१/२०२५ कलम ३०३/२ या प्रकरणात अटक दाखल करण्यासाठी पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी यांनी प्रोड्युस वॉरंट मिळवून त्याला परभणी कारागृहातून ताब्यात घेत सेलू येथे आणले होते.

कसे घडले पलायन?

बुधवार रात्री ८:२१ वाजता आरोपीला तपासणीसाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी पूर्ण करून ९:१२ वाजता त्याला हातकड्या घालून परत पोलीस ठाण्याकडे नेत होते.
त्यावेळी, वाहनात बसत असताना आरोपीने पोलीस नायक गोरे यांच्या हाताला जोरदार झटका देत पळ काढला. परिसरातील अंधार, शारदा ग्राऊंडच्या दिशेने असलेली रेल्वे पटरी आणि कापूस–तुराच्या उंच पिकांचा फायदा घेत आरोपी क्षणात गायब झाला.

तत्काळ पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांना माहिती देण्यात आली. पोलीसांनी परिसरात सर्वत्र शोध मोहीम राबवली; मात्र पीकांच्या गर्दीमुळे आरोपीचा मागमूस लागला नाही.

नवीन गुन्हा दाखल

घटनेनंतर पोलीस हवालदार सुरेश कु-हे यांच्या फिर्यादीवरून
गुरनं ६२२/२०२५, कलम २६२ भारतीय दंड संहिता अंतर्गत आरोपीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचा विश्वास फसला ?

कारागृहातून ताब्यात घेतल्यापासून तपासणीपर्यंत आरोपी शांत दिसत असल्याने पोलिसांनी दाखविलेला विश्वासच त्यांना महागात पडला. संधी मिळताच हातकडीसह पळून जाण्यात आरोपी यशस्वी झाला आहे.

पलायन केलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीसांकडून रात्रीपासूनच विशेष मोहीम सुरू असून, परिसरातील शेतजमिनी, रेल्वे परिसर आणि संशयित ठिकाणी तपासणी वाढविण्यात आली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button