
सेलू शहर व परिसरातील नागरिकांसाठी सेलू पोलीस स्टेशन तर्फे विशेष आवाहन करण्यात आले आहे. आगामी काळात विविध धार्मिक सण, उत्सव आणि सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेरगावी जात असल्याने घरफोडी व चोरीची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी खालील सूचना देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

🔹 घरातील दागिने-रोख बँकेत ठेवा
महत्वाचे दागिने किंवा रोख रक्कम घरातील कपाट, तिजोरी किंवा अलमारीत ठेवू नयेत. चोर सर्वप्रथम याच ठिकाणी शोध घेतात. सुरक्षिततेसाठी बँकेत किंवा दुसऱ्या सुरक्षित जागी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
🔹 विश्वासू शेजाऱ्यांची मदत घ्या
बाहेरगावी जाण्याची माहिती विश्वासू शेजारी व नातेवाईकांना द्यावी. अधूनमधून घराची पाहणी करण्यास व लक्ष ठेवण्यास सांगावे.
🔹 घरातील लाईट सुरू ठेवणे आवश्यक
बाहेरगावी जाताना घरातील बाहेरील व आतील लाईट सुरू ठेवावेत, जेणेकरून संशयास्पद हालचाली लगेच लक्षात येतील.
🔹 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर वाढवा
ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या घरासमोर, दुकानासमोर व सार्वजनिक रस्त्यांना कव्हर करणारे सीसीटीव्ही बसवावेत. “आपण सीसीटीव्ही कक्षेत आहात” असे सूचनाफलक लावल्याने गुन्हेगारीवर आळा बसतो.
🔹 कामावर जाणाऱ्या कुटुंबांसाठी अतिरिक्त सावधगिरी
पती-पत्नी किंवा सर्वजण कामावर जात असल्यास दिवसा सुद्धा शेजाऱ्यांना लक्ष ठेवण्यास सांगावे व सतर्क राहावे.
🔹 वॉचमन नेमण्याची सूचना
लहान व्यापारी पट्टे, कॉलनी किंवा पेठांमध्ये रात्री गस्तीसाठी वॉचमन नेमल्यास सुरक्षिततेत वाढ होते.
🔹 अत्याधुनिक सुरक्षा साधनांचा वापर
घर व दुकानांच्या सुरक्षेसाठी मोबाईलशी कनेक्ट होणारी नवी साधने व सॉफ्टवेअर वापरण्याचा विचार करावा.
🔹 आपत्कालीन मदतीसाठी 112 वर संपर्क
अडचण आल्यास 112 हा क्रमांक डायल करून तात्काळ पोलीस मदत मिळू शकते. शहरात त्वरीत प्रतिसाद देण्यासाठी विशेष व्यवस्था आहे.

👉 “काळजी घ्या, सुरक्षित रहा आणि नुकसान टाळा” असे आवाहन पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी केले असून नागरिकांनी याला गांभीर्याने प्रतिसाद देण्याचे आवाहन पोलीस स्टेशन सेलू यांच्याकडून करण्यात आले आहे.