
पालकमंत्री ,मुख्याधिकारी यांच्याकडे केली तक्रार.
परवानगीशिवाय खोदला खड्डा?

सेलू शहरातील राजाराम नगर परिसरात पूर्वपरवानगी न घेताच एका मोबाईल टावरच्या कंपनीने भला मोठा खड्डा मोबाईल टावर उभारणीसाठी खोदला आहे. हा खड्डा खोदल्यानंतर राजाराम नगर मधील रहिवाशांनी चौकशी केली असता हा खोदण्यात आलेला भला मोठा खड्डा एका मोबाईल टॉवरचा असल्याचे पुढे आले तेव्हा परिसरातील रहिवासी यांनी एकत्र येऊन शनिवार ३० ऑगस्ट रोजी पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांना लेखी पत्र देऊन हे काम थांबविण्याची मागणी केली आहे.तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम आणि पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनाही प्रत्यक्ष भेटून या मोबाईल टॉवरच्या होणाऱ्या कामास विरोध दर्शविला आहे. राजाराम नगर मधील रहिवाशी मुख्याधिकारी तुकाराम कदम यांना भेटले असता सर्वे नंबर ६ प्लॉट क्रमांक २ या ठिकाणी या मोबाईल टॉवरच्या कामास परवानगी देण्यात आली नसल्याचे रहिवाशांना मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे ७०टक्के रहिवाशी यांची संमती असेल तरच अशा प्रकारच्या मोबाईल टॉवरला परवानगी मिळते असे रहिवाशांनी निवेदन प्रसंगी संबंधिताकडे स्पष्ट केले आहे. आता विनापरवाना मोबाईल टावरचा हा खड्डा खोदण्याचे धाडस संबंधितांनी नेमके कोणाच्या आशीर्वादाने केले हे मात्र समजू शकले नाही.
