
सेलू : पोलीस काका-दिदी पथक, सेलू यांच्या वतीने स्टुडंट पोलीस कॅडेट (SPC) कार्यक्रमांतर्गत नूतन कन्या प्रशाला, सेलू येथे विद्यार्थ्यांना विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम घेण्यात आला.

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक अरुण नागरे, पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे व महिला पोलीस हवालदार अस्मिता मोरे यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम पार पडला. पोलीस कर्मचारी दिपक जंबुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांना शिस्त, संयम, वडीलधाऱ्या व्यक्तींचा सन्मान, मूल्य व नीतीशास्त्र, सायबर सुरक्षा, महिला व मुलींची सुरक्षा, वाहतूक नियम व रहदारीबाबत जनजागृती, महाराष्ट्र पोलीस, भ्रष्टाचार प्रतिबंध तसेच आपत्ती व्यवस्थापन याबाबत माहिती देण्यात आली. मोबाईलच्या वाढत्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने मोबाईलचा योग्य व मर्यादित वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले.

तसेच आपत्कालीन परिस्थितीत डायल ११२, सायबर फसवणुकीसाठी १९३० आणि बालकांच्या मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाइन १०९८ या क्रमांकांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांना SPC कार्यक्रमाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. प्रमाणपत्र मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. SPC उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, कायद्याचा आदर, सुसंस्कृतपणा आणि सुजाण नागरिकत्वाची भावना निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.