
श्री महेश गायकवाड यांनी सेलू न.प नवीन मुख्याधिकारी म्हणून स्वीकारला पदभार…
प्रतिनिधी सतिश आकात
दि. 17 फेब्रुवारी रोजी सेलू नगर परिषद येथे नवीन मुख्याधिकारी म्हणून श्री. महेश गायकवाड यांनी पदभार स्वीकारला. यानिमित्त त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी नगराध्यक्ष मिलिंददादा सावंत, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे तसेच नगरसेवक भाऊ सोनवणे, मनीष कदम, शफी भाई, अन्वर तडवी, सुबोध काकडे, विनोद धापसे, सुनील हिवाळे, विष्णू इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, माजी मुख्याधिकारी तुकाराम कदम यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील मोकळ्या जागा व भाडेपट्ट्यांवर दिलेल्या मालमत्तांबाबत विविध चर्चा रंगत होत्या. त्या पार्श्वभूमीवर नवीन मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने शहरात नव्या अपेक्षांना उधाण आले आहे.
स्वागताच्या शुभेच्छांबरोबरच नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकाऱ्यांच्या येण्याने नागरिकांच्या मनात काही सवालही घोळत आहेत.नवीन मुख्याधिकाऱ्यांच्या आगमनाने प्रशासनात नवा उत्साह निर्माण झाला असला तरी, आता नागरिकांना केवळ स्वागत समारंभ नव्हे तर ठोस कृतीची अपेक्षा आहे. सेलूकरांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देत शहर विकासाच्या प्रक्रियेला गती देणे, हीच खरी परीक्षा ठरणार आहे.