
सेलू तालुक्यातील देऊळगाव गात परिसरात बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका दारू विक्रेत्यास रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत देशी दारूच्या 192 बाटल्या व मोटारसायकल असा एकूण 65 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी बालकिसन पिराजी साळवे (वय 38, रा. देऊळगाव गात, ता. सेलू, जि. परभणी) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(इ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी पहाटे सुमारे 5 वाजता, सातोना ते आहेर बोरगाव जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर पश्चिमेस अंदाजे 3 किमी अंतरावर आरोपी बेकायदेशीररित्या दारू वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

तपासादरम्यान आरोपीकडून पांढऱ्या रंगाच्या चार पिशव्यांमध्ये खाकी रंगाचे चार बॉक्स, प्रत्येकी 180 एमएल क्षमतेच्या सीलबंद देशी दारूच्या एकूण 192 बाटल्या (भिंगरी संत्रा लेबल) जप्त करण्यात आल्या. या दारूची किंमत 15 हजार 360 रुपये असून, तसेच होंडा कंपनीची एस.पी. शाईन मोटारसायकल (क्र. MH 22 BE 6234) किंमत अंदाजे 50 हजार रुपये असा एकूण 65 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दीपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर दहिफळे, पोलीस अमलदार घुगे, नर्सिंग शेलाळे व पंकज आगाशे यांनी केली. माननीय पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस हवालदार जानकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
