
सेलू (जि. परभणी):
सेलू नगर परिषद निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेत थेट हस्तक्षेप झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनचा क्रमांक अनधिकृतपणे बदलण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मतदान केंद्र क्रमांक ४ (केशवराज बाबासाहेब विद्यालय, सेलू) येथे अधिकृतरीत्या नोंद असलेले P33592 क्रमांकाचे ईव्हीएम मशीन डावलून प्रत्यक्षात C47513 क्रमांकाचे मशीन वापरण्यात आल्याचा आरोप अधिकृत प्रतिनिधीकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा बदल कोणत्याही लेखी आदेशाशिवाय, अधिकृत परवानगीशिवाय आणि निवडणूक आयोगाच्या नियमांना धाब्यावर बसवून करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मतदानाच्या दिवशी हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तर देणे टाळले. यामुळे हा केवळ प्रशासकीय हलगर्जीपणा नसून जाणीवपूर्वक केलेली छेडछाड असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम मशीन हा कणा मानला जातो. मात्र त्याच मशीनच्या क्रमांकात बदल होणे म्हणजे लोकशाहीवर थेट घाला असल्याची तीव्र प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. “जर ईव्हीएम सुरक्षित नसेल, तर निवडणूक निष्पक्ष कशी?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणी तक्रारदाराने—
🔴 मशीन क्रमांक बदलण्यामागील आदेश व जबाबदारी निश्चित करावी,
🔴 सर्व ईव्हीएम संबंधित कागदपत्रे व सील अहवाल जाहीर करावेत,
🔴 स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,
अशी ठाम मागणी केली आहे.
या गंभीर आरोपांमुळे सेलू नगर परिषद निवडणुकीच्या प्रक्रियेवर राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या कथित ईव्हीएम गैरप्रकारामुळे सेलू शहरात संतापाची लाट उसळली असून, निवडणूक प्रशासनाने तात्काळ स्पष्टीकरण दिले नाही तर न्यायालयाचे दार ठोठावले जाईल, असा इशाराही देण्यात येत आहे. आता या गंभीर आरोपांवर निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे….!