
सेलू : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सेलू अंतर्गत सेलू, मानवत व पाथरी पोलीस स्टेशन हद्दीत घडणाऱ्या विविध गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळावी यासाठी अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन आज दिनांक 08 डिसेंबर 2025 रोजी उपविभाग सेल येथेh कार्यान्वित करण्यात आली.
ही फॉरेन्सिक व्हॅन पोलीस अधीक्षक मा. रविंद्रसिंह परदेशी, परभणी यांच्या विशेष प्रयत्नातून प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, नांदेड येथून सेलू उपविभागासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सदर व्हॅनमध्ये भौतिक, रासायनिक, जैविक तसेच डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी लागणारी सर्व अत्याधुनिक किटस, रसायने आणि उपकरणे उपलब्ध आहेत. तसेच विविध विषयांतील प्रशिक्षित व तज्ञ अधिकाऱ्यांची नेमणूक करून या व्हॅनची तपासासाठी विशेष सज्जता करण्यात आली आहे.
या अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गंभीर, गुंतागुंतीचे व तांत्रिक स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणणे सुलभ होणार असून घटनास्थळी शास्त्रोक्त पद्धतीने पुरावे गोळा करून दोषसिद्धीची टक्केवारी वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
लोकार्पण प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दिपककुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक श्री. दिपक बोरसे, वाचक पोलीस उपनिरीक्षक श्री. दिगंबर दहिफळे, उपविभाग कार्यालयातील अंमलदार तसेच नेमलेले फॉरेन्सिक तज्ञ आणि प्रशिक्षित कर्मचारी उपस्थित होते.
सेलू उपविभागातील गुन्हे तपास यंत्रणेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने गुन्हे उकल आणि न्यायप्रक्रियेतील अचूकता अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.