परभणी जिल्ह्यातील सात नगरपरिषद निवडणुकांकरिता जात पडताळणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा आदेश

परभणी, दि. ८ नोव्हेंबर —
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ आणि पूर्णा या सात नगरपरिषदांच्या सदस्य व अध्यक्ष पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, राखीव जागांवरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम ९(अ) व ११(१)(ब) अन्वये नामनिर्देशन पत्रासोबत जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

तथापि, जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास उमेदवारांना संबंधित पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पावती नामनिर्देशन पत्रासोबत सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, शासनाच्या ३ नोव्हेंबर २०२५ च्या अध्यादेशानुसार, निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या अनुषंगाने, जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आदेश दिला आहे की, संबंधित नगरपरिषदांचे मुख्याधिकारी तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या जात वैधतेसंदर्भातील अर्ज संबंधित जात वैधता पडताळणी समितीकडे सादर करावेत.

या आदेशामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेला आणि कायदेशीर प्रक्रियेला बळ मिळणार असून, सर्व उमेदवारांसाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना मिळाल्या आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button