सेलू येथे अवैध तलवारींची विक्री करणारे दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात!

(प्रतिनिधी): परभणी जिल्हा पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने सेलू उपविभागात धडक कारवाई करत अवैध तलवारींचा साठा ठेवून विक्रीसाठी ठेवणाऱ्या दोघा तरुणांना अटक केली. करजखेडा (पुनर्वसन) परिसरात १२ ऑक्टोबर रोजी छापा टाकून पोलिसांनी तब्बल पाच तलवारी जप्त केल्या असून जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ₹१० हजार इतकी आहे.

अटक करण्यात आलेल्यांत निलेश गणपत बनगे (वय २४, रा. राजवाडी, ह.मु. करजखेडा पुनर्वसन, सेलू) आणि गणेश कोंडीबा परसे (वय २३, रा. शेवडी, ता. मानवत, ह.मु. करजखेडा पुनर्वसन, सेलू) यांचा समावेश आहे. दोघांचेही मूळ व्यवसाय मच्छीमारी असा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गोपनीय माहितीच्या आधारे छापा घालण्यात आला असता हे दोघे आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर पद्धतीने तलवारींचा साठा करून विक्रीसाठी ठेवत असल्याचे उघड झाले. त्यांच्या ताब्यातून पाच तलवारी हस्तगत करण्यात आल्या.

या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१०/२०२५ नोंदवून भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४, २५ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात पार पडली. मोहिमेत स्थायी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, स.पो.नि. रामेश्वर धोंडगे, पोलीस अंमलदार विलास सातपूते, संजय घुगे, जयश्री आव्हाड, सिध्देश्वर चाटे, उमेश चव्हाण, मधुकर ढवळे, राम पौळ, नामदेव डुबे (सर्व स्थायी गुन्हे शाखा) तसेच गणेश कौटकर (सायबर सेल, परभणी) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

सदरील गुन्ह्यातले दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास पोलीस हवालदार पुलाते यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button