
सेलू –
“भारताच्या अमृतकाळात सर्वसामान्य माणसाचे जीवनमान सुखी-संपन्न करण्यासाठी केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर (जीएसटी) दरकपातीचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून ही सुधारणा देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी चालना देणार आहे,” असा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या राज्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या संकल्पानुसार, जीएसटीच्या नव्या कररचनेत आता केवळ १८ टक्के व ५ टक्के असे दोनच दर राहणार आहेत. यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा बोजा हलका किंवा संपुष्टात येणार आहे. यामुळे सामान्य माणूस, शेतकरी, महिला, युवक, लघु व मध्यम उद्योगक्षेत्र यांना थेट लाभ होणार असल्याचे त्या म्हणाल्या.
बोर्डीकर म्हणाल्या,
“या सुधारणेमुळे व्यापार क्षेत्राला नवी उभारी मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि कुटुंबांची आर्थिक समृद्धी घडेल. देशाच्या नागरिककेंद्रीत उत्क्रांतीची ही सुरुवात असून प्रत्येक कुटुंबाचा यात सहभाग असेल.”
२०१७ पासून सुरू झालेल्या जीएसटी करप्रणालीमुळे आर्थिक सुधारणा वेगाने झाल्या असून आतापर्यंत २५ कोटी लोकसंख्या दारिद्र्यरेषेबाहेर आल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “आज भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आहे आणि लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर झेपावेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्याचबरोबर काँग्रेसवर निशाणा साधत त्यांनी म्हटले की, “प्रत्येक मुद्यावर राजकीय रंग चढवणे ही काँग्रेसची सवय आहे. मोदी सरकार मात्र विकासाचे राजकारण करणार असून सर्व समाजघटकांचे भले करण्याच्या मार्गावर ठाम आहे.”
👉 जीएसटी दरकपातीमुळे गरीब, मध्यमवर्गीय, व्यापारी व उद्योग क्षेत्रातील प्रत्येक घटकाला थेट फायदा होणार असल्याचा विश्वासही मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला.