पात्र लाभार्थ्यांची अडवणूक कराल तर गाठ माझ्याशी आहे- आ.डॉ.गुट्टे

गंगाखेड येथे तालुकास्तरीय आढावा बैठक

तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे अनेक महिने प्रङ्घलंबित राहात असतील तर मग, तहसीलदारांसह संबंधित कर्मचार्‍यांची काय गरज आहे? शासन तुम्हाला काम करण्यासाठी पगार देते की लोकांची अडवणूक करण्यासाठी? चिरीमिरीच्या अपेक्षेने सर्वसामान्य लोकांना लाभांपासून वंचित ठेवताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? तुम्ही तुमचा कारभार सुधारणार आहात की नाही? आकडेवारी वेगळी सांगताय आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी वेगळी कशी? रीतसर व नियमात बसणारे प्रस्ताव रद्द कसे होतात? अशा प्रश्नांची सरबत्ती करत स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी तहसीलदार श्रीमती.उषाकिरण श्रृंगारे यांच्यासह संबंधित कर्मचार्‍यांची चांगलीच कानउघडणी केली. तसेच इथून पुढे असला प्रकार खपवून घेतला जाणार नाही. आता दरमहा मिटींग घेणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची अडवणूक कराल, तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड इशारा सुध्दा आ.डॉ.गुट्टे यांनी सोमवारी (दि.28) उपस्थित कर्मचार्‍यांना दिला. शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित तालुकास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी लाभार्थी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, शिधाधारकांना अन्नधान्य पुरवठा संदर्भात विस्तृत माहिती घेतली. तसेच शासकीय योजनांची आकडेवारी आणि प्रत्यक्षातली तफावत यामुळे तहसीलदारांसह सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, आम आदमी विमा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना अशा विविध योजनांची तालुक्यातील सद्यस्थिती आणि अंमलबजावणी याविषयी सूचना दिल्या. तालुक्यात 163 दुकाने आहेत. मात्र, शासनाच्या गुगल मॅप नियमामुळे त्यात इतर तालुक्यातील 67 दुकानांची भर पडली आहे. त्यामुळे स्थानिक तालुक्यात अन्नधान्य पुरवठा करताना अडचणी येतात. आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ आणि वाहनांची संख्या उपलब्ध नाही, असे तहसीलदार श्रीमती.उषाकिरण श्रृंगारे यांनी सांगितले. त्यामुळे बैठकीतूनच तातडीने जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला. तसेच त्यांच्या कानावर संबंधितांच्या अडचणी घातल्या. शिवाय, तालुक्यातील पुरवठा सुरळीत व वेळेवर करण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ आणि वाहने उपलब्ध करून द्या, असा सूचना दिल्या.
यावेळी तहसीलदार उषाकिरण शृंगारे, गटविकास अधिकारी अक्षय सुक्रे, किशनराव भोसले, संदीप अळणुरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नंदकुमार पटेल, गंगाखेड तालुका प्रभारी बालाजी लटपटे, उपसभापती संभाजीराव पोले, माजी पंचायती समिती सदस्य लक्ष्मण मुंडे, राजेभाऊ बापू सातपुते, माजी उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, माजी नगरसेवक कलीम शेख, उद्धवराव चोरघडे, रमेश पेकम, पिराजी कांबळे, बालासाहेब शिंदे, आप्पासाहेब कदम, वैजनाथ टोले, संजय पारवे, शेषराव सलगर, संदीप राठोड, बालासाहेब भोसले यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्ष व मित्र मंडळाचे पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच व तालुका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button